भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनींने इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनी E-Motorad मध्ये गुंतवणूक केली आहे.ही माहिती कंपनीचे संस्थापक कुणाल गुप्ता यांनी दिली आहे. कुणाल गुप्ता पुढे म्हणाले की, महेंद्रसिंग धोनीसोबत जोडले गेल्याने लोकांचा ई-बाईकवरील विश्वास वाढेल आणि लोकांना ब्रँडबद्दल अधिक माहितीही मिळेल. ई-मोटरॅडच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महेंद्रसिंग धोनीचा इलेक्ट्रिक सायकलसोबतचा फोटो दिसत आहे. महेंद्र सिंह धोनींने काही वर्षांमध्ये ज्या कंपणांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्या यादीमध्ये पुण्यामधील E-Motorad कंपनी सहभागी झालेली आहे. धोनीने फिटनेस स्टार्ट-अप Tagda Raho, खतबुक आणि वापरलेली कार रिटेलर Cars24 यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. E-Motorad चे देशभरात 350 पेक्षा जास्त डीलर्स आहेत. 10 एक्सपीरियंस सेंटर देखील आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, ई-मोटरॅडने 140 कोटी रुपयांची विक्री केली. तर गेल्या आर्थिक वर्षात ही विक्री सुमारे 115 कोटी रुपये होती.
E-Motorad या कंपनीची 70 टक्के उत्पादने ऑफलाईन पद्धतीनेच विकली जातात. उर्वरित उत्पादाने ही Amazon आणि Flipkart यासारख्या ऑनलाईन स्टोअर्समार्फत विकली जातात. आता धोनीनेच थेट गुंतवणूक केल्यामुळे या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. धोनी म्हणाला “भविष्य आपल्या हातात आहे. आम्ही अशा युगात आहोत, जिथे सस्टेनेबल सोल्युशन्सला आकार देण्यात इनोव्हेशन मोठी भूमिका साकारतो आणि मी नव्या काळाच्या कंपन्यांचा प्रशंसक आहे,” असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटल्याचं इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं. “धोनीपेक्षा चांगला आणि विश्वासार्ह असा दुसरा कोणताही ब्रँड नाही. धोनी या ब्रँडमध्ये सामील झाल्याने ई-बाइकिंग श्रेणीमध्ये अधिक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे असे कुणाल गुप्ता म्हणाले.